
. महारथींचा महामेळावा
एक जमाना होता आणि आजही आहे, घरातील म्हातारे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ही घरातील अडगळ, अडचण समजले जायचे, पण काळानुरूप बदल, काही ठिकाणी स्वीकारार्ह्य झाले आहेत, केंद्र सरकार, त्यातली त्यात आपले महाराष्ट्र सरकार, ज्येष्ठांच्या उत्थानासाठी काहीतरी करावे, या हेतूने प्रेरित होऊन नवनवीन योजना आणण्याचा व त्या समाजात रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे, व त्यांचे उत्तम प्रकारे ब्रॉडकास्टिंग करीत आहे…
आज ज्येष्ठांना जणूं सुगीचे दिवस येऊ पाहत आहे, नव्हे जणूं आल्यासारखेच आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही, सरकारी दरबारापर्यंत ज्येष्ठांची गाऱ्हाणी पोहचली आहेत, शहरापासून खेड्यापर्यंत हे लोन दिवसेंदिवस वाढते आहे ज्येष्ठांच्या समस्या ही एक सामाजिक बाब समजून सरकार या बाबतीत जागृत झाले आहे…
महाराष्ट्राची विद्याविभूषित पुण्यनगरी पुणे येथे, मांडके हॅप्पीनेस फाउंडेशन आणि लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघटना (ASCOP), कर्वे समाज शिक्षण संस्था, व फेस्कॉम महाराष्ट्र , यांच्या समन्वयाने बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला होता…
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट यांनी या महामेळाचे उद्घाटन केले…
ज्येष्ठांनी खचून न जाता रोजचे जीवन जगणे आनंददायी करावे, मी देखील वयाच्या ६४ व्या वर्षात पदार्पण केले असून ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत आलो आहे. ज्येष्ठांचे प्रश्न आणि समस्या काळानुरूप बदलत असल्या आणि त्या अनंत असल्या तरी, ज्येष्ठांनी खचून न जाता जगणे हे एक संघर्ष मानून रोजचे जगणे आनंददायी करावे, असा मूलमंत्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उद्घाटन प्रसंगी दिला…
यावेळी व्यासपीठावर मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन, पुणेचे प्रमुख विश्वस्त सुधीर मांडके, समाज कल्याण विभागाचे प्रभारी आयुक्त प्रवीण पुरी, समाज कल्याण विभागाच्या विभागीय आयुक्त वंदना कोचुरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, ॲस्कॉप संघटना, पुणेचे अध्यक्ष दिलीप पवार, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, पुणेचे अध्यक्ष बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्था, पुणेचे संचालक डॉ. महेश ठाकूर, ॲस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवलकर, फेस्कॉमचे माजी अध्यक्ष अरूण रोडे आणि जनसेवा फौंडेशनच्या एल्डरलाईन प्रकल्पाचे व्यवस्थापक स्मितेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते….
या महामेळाव्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि ॲस्कॉप यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारित कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केलेल्या निष्कर्ष अहवालाचे प्रकाशन तसेच यावल समाचार विशेष अंकांचे परकाशन मा मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले…
यावेळी बोलताना माननीय संजय जी शिरसाट, यांनी अपेक्षाविरहीत आयुष्य जगल्यास आयुष्य अधिक सुखी होते, हा कानमंत्र लक्षात ठेवावा. ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक असून तुमच्या समस्या निश्चित सोडवल्या जातील…
यावेळी ॲस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवलकर यांनी ज्येष्ठ महिलांचे प्रश्न मांडले. डॉ. मिलींद सरदार यांनी ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक समस्या मांडल्या. फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब टेकाळे यांनी शासनाने जाहीर केलेल्या योजनेची सविस्तर माहिती दिली .या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनास विनंती केली…
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन, पुणेचे प्रमुख विश्वस्त सुधीर मांडके यांनी ज्येष्ठ नागरिकांचा महामेळावा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. जोसेफ साखरे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. अरुण बुलाखे यांनी आभार मानले…
*यावेळी ‘घरातील आणि *समाजातील ज्येष्ठांना आदर आणि सन्मानाने वागवू आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सुशृषा करू,’ अशी सामुहिक प्रतिज्ञा यावेळी मान्यवरांसह उपस्थित सर्वांनी केली.*
– सुरेश पवार
प्रवक्ता-प्रसिद्धी प्रमुख फेस्काॅम महाराष्ट्र.
१४/६/२०२५

