
डॉ. राधाकृष्ण भट
९जुलै१९४३ — १७ फेब्रुवारी २००९ ८०वी जयंती ॥ तव स्मरण नित्य आम्हा घडो॥
डाॅ.आर.एम.भट मूळचे उडपी जवळ च्या पांगलचे, वडील एका शाळेत मुख्याध्यापक होते. दहावी पर्यंतचे शिक्षण गांवीच शिष्यवृत्तीवर झाले. डाॅक्टर पाच भावंडातले चौथे. सर्वात मोठे गोपीनाथ, डोंबिवली पश्चिम येथील गोपी टाॅकिजचे मालक, त्यानंतर कमलाक्ष,मग पांडुरंग, भाकरा नांगल धरणावर अभियंते पद त्यांनी भूषवले होते. त्यानंतर डाॅक्टर. बहिण,भावंडात शेवटची. मावशीच्या आग्रहापायी ते मुंबईला आले.
सुरवातीस सेंट झेवियर काॅलेज व पुढे जे.जे.(मेडिकल)येथे शिक्षण. ‘एम डी इंटर्नल मेडिसीन’ ही पदवी प्रावीण्यासह मिळवली. मावशीने दिलेल्या आधारामुळे डाॅक्टर जसे मुंबईत आले, तसेच “शिक्षण पूर्ण झाल्यावर डोंबिवलीत ये.” असे मोठ्या बंधूंनी बजावलेले असल्यामुळे डाॅक्टर डोंबिवलीत आले व डोंबिवलीत स्थिरावले.
आणि पुढील सहा-सात वर्षातच त्यांनी आयसीयू सुविधा युक्त ‘अनुपम’ हाॅस्पिटल सुरू केले. विख्यात ह्रदयरोग तज्ञ पद्मविभूषण डाॅ.बी.के.गोयल व पद्मभूषण डाॅ.के.के.दाते तसेच अन्य नामवंत व प्रतिष्ठीत मंडळी उदघाटनाला उपस्थित होती. तत्कालीन ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ.यू.प्रभाकर राव यांनी डाॅ.भटांना रोटरी चळवळीशी जोडले. डाॅक्टरांचा सेवाभाव,तळमळ फारकाळ दुर्लक्षीत राहणे शक्य नव्हते.डाॅ.राधाकृष्ण भट रोटरी क्लब आॅफ डोंबिवलीचे अध्यक्ष व पुढे रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर झाले. मुंबई बाहेरील रोटरियनला प्रथमच हा बहुमान मिळाला.
रोटरीच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांत डाॅक्टरांनी सहभाग घेतला. इनरव्हील क्लब निर्मितीची कल्पना त्यांचीच. डाॅक्टरांच्या सुविद्य पत्नी अनुराधा भट क्लबच्या चार्टर सेक्रेटरी झाल्या. रोटरी क्लबसाठी डाॅ.भटांनी अनेक पुस्तके लिहिली. ज्येष्ठ नागरिकांची जगभरची वाढती संख्या लक्षात घेऊन रोटरी इंटरनॅशनलने ज्येष्ठांसाठी काही उपक्रम सुरु करायचे ठरवले.
भारतातील ज्येष्ठ नागरिक संघांचे तसेच ज्येष्ठ नागरिक चळवळीचे जनकत्व डाॅक्टरांकडे जाते. दि.१० सप्टेंबर १९७७ या दिवशी भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवलीत स्थापन करून त्यांनी चळवळीची मुहुर्तमेढ रोवली. त्यावेळी त्यांचे वय ३४वर्षांचे होते. त्यांनी रोटरी सभागृहात संघाला कार्यक्रमास जागा दिली. रोटरीने डाॅक्टरांची ज्येष्ठ नागरिक संघ संकल्पना उचलून धरली. डाॅक्टरांनी त्यासाठी देशभर प्रवास केला.
दि.१२डिसेंबर १९८० रोजी आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने त्यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची(फेस्काॅम) स्थापना केली. त्यांनी ‘गोल्डन-टाईम’ वार्तापत्र काढले. महासंघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन डोंबिवलीत भरले. विजय मर्चंट अधिवेशनास उपस्थित होते. पुढे फेस्काॅम ही स्थायी चळवळ उभी राहिली. सेवाभावी कार्यासाठीचा ‘सर्विस अबाव्ह सेल्फ’ हा सर्वोच्य सन्मान सर्वप्रथम डाॅ.भटांना देण्यात आला.
डोंबिवलीतील धन्वंतरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होतेच. अनुराधा भट इनरव्हील क्लब चळवळीत सक्रिय होत्या, त्या जीन पाॅल हॅरिस फेलोशिफ मिळवणार्या पहिल्या इनरव्हील अध्यक्षा ठरल्या. महाराष्ट्र ज्येष्ट नागरिक महासंघाच्या पुणे येथील रौप्य महौत्सवी अधिवेशनात डाॅ.राधाकृष्ण भटांना फेस्काॅमचे मानद अध्यक्ष (president Emirates) या पदाने सन्मानित करण्यात आले. सुचित्रा,संध्या आणि सुप्रिया या त्यांच्या तीनही कन्या डाॅक्टर आहेत.
१७फेब्रुवारी २००९रोजी डाॅ.राधाकृष्ण तथा आर.एम.भट यांनी वयाच्या ६५व्या वर्षी इहलोकाचा निरोप घेतला. परंतु ज्येष्ठ नागरिक संघांच्या रुपाने आजही ते आपणात आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!
(डाॅ.संध्या भट यांच्या सौजन्याने तसेत त्यांनी दिलेल्या माहिती आधारे.)
चंद्रकांत महामुनी – मुख्य सचिव फेस्कॉम महाराष्ट्र
(माजी अध्यक्ष फेस्कॉम पुणे
