About Us

३) ध्येय व उद्दिष्टे : फेस्कॉमची ध्येये व उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
अंगीकृत उद्दिष्टे : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या आणि त्यांच्या संघांच्या समग्र कल्याणकारी उपक्रमांचे एका नेतृत्वाखाली एकीकरण व सुदृढीकरण करणे, आणि ज्येष्ठांचे बहुमोल ज्ञान आणि प्रगाढ अनुभव, प्रगल्भता, चैतन्य आणि कौशल्य, यांचा एकूण समाजाच्या, आणि विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपयोग करुन घेणे.
३.१. समाजाचे आदरणीय व सन्माननीय सदस्य असल्याची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने निरनिराळ्या योजना व कार्यक्रमांचे माध्यमांतून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानाची प्रतिष्ठा व गुणवत्ता सुधारणे व यथास्थित ठेवणे.
३.२ वृद्धांच्या कल्याणात आणि / अथवा संबंधित वृद्धत्वविज्ञान, व वृद्धत्व रोग चिकित्सा, यांच्या सर्व शाखांमध्ये रस असणारे व त्याला समर्पित अशा सर्व संस्था व संघटना, क्लब, मंडळे यांना राज्य पातळीवरील एका संस्थेच्या छत्राखाली आणणे व त्यांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे व सर्व बाबतीत त्यांचे हितसंबंधात समन्वय साधणे, एकस्तर करणे, वृद्धिंगत करणे व त्यांना संलग्न करुन घेणे.
३.३ ज्या – ज्या ठिकाणी अशा संघांच्या निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती अस्तित्वात असेल, अशा सर्व ठिकाणी वृद्धांच्या कल्याणाला समर्पित संघ/संस्था/क्लब/मंडळे स्थापन करण्यासाठी व चालविण्यासाठी आर्थिकसह सर्व मार्गानी व साधनांनी सहाय्य करणे.
३.४ संलग्नित संघांना मनोरंजन, शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा आदि विविध क्षेत्रात सुलभपणे कार्य व प्रगती करता यावी, यासाठी विस्तृत मार्गदर्शिका तयार करून ती त्यांना कळविणे.
३.५ वयोवर्धन व तत्संबंधीत विषय जे फेस्कॉमच्या (महासंघाच्या) दृष्टीने या हेतूसाठी आवश्यक असतील त्यासंबंधी पुस्तके, नियतकालिके, पत्रके आणि / अथवा वृत्तपत्रे गोळा करणे, वाटप करणे, मुद्रित करणे आणि प्रकाशित करणे.
३.६ सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांच्या व विशेषतः एकाकी आणि / अथवा दिव्यांग व्यक्ति, निराधार, वृद्ध स्त्रिया, मुख्यतः विधवा यांच्याशी संबंधित समस्यांचा शोध घेणे व त्यांचा अभ्यास करणे, या समस्यांच्या निराकरणाचे उपाय शोधणे, व समाजाच्या माहितीसाठी वृत्तपत्रे, मासिके आणि दृक-श्राव्य माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देणे.
३.७ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीच्या विषयाबाबत अधिवेशने, स्नेह संमेलने, छोटे मेळावे, व्याख्याने परिसंवाद, परिषदा, कार्यशाळा व शिबिरे आयोजित करणे, व अशा कार्यक्रमांना मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणे.
३.८ ज्येष्ठ नागरिकांची बुद्धिमत्ता, शहाणपण, परिपक्वता, प्रगल्भता, अनुभव, उत्साह व उपलब्ध वेळेचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा म्हणून मार्ग व साधने शोधणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला पोषक अशा प्रवृत्ती, उदा. कुटुंब कल्याण, सामाजिक सुरक्षा, मनोरंजन, शिक्षण विशेषतः मुलांचे व प्रौढांचे संशोधन, आरोग्य, तसेच वृद्धत्वविज्ञान व रोगचिकित्सासारखी विशेषज्ञांची क्षेत्रे, आणि आयुर्वेद, योग, होमिओपॅथीसारख्या पर्यायी चिकित्सापद्धती यांना शक्य असेल तेवढ्या प्रमाणात एका छत्राखाली आणण्याच्या हेतूने त्यांची वाढ व विकास करणे.
३.९ भारत सरकारने सन १९९९ मध्ये जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाच्या तरतुदींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी भारत सरकार आणि तत्सम सरकारें अथवा बिनसरकारी किंवा राज्य, विभागीय, जिल्हा आणि गट पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा (एजन्सीज) वर दबाव आणणे, व त्यांना प्रवृत्त करणे, आणि अशा यंत्रणांना वेळोवेळी आवश्यक असेल त्याप्रमाणे सर्व तन्हेचे सहकार्य व सहाय्य करणे आणि या सोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वसाधारण कल्याणासाठी आवश्यक व शक्य असतील अशा तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी आपापल्या परीने प्रयत्न करणे.
३.१० फेस्कॉमशी (महासंघाशी) समान ध्येये आणि उद्दिष्ट्ये असणाऱ्या भारतातील किंवा भारताबाहेरील संस्था, संघ, महासंघ, संयुक्त महासंघ आणि राष्ट्रीय आणि / अथवा आंतरराष्ट्रीय संघटनांशी संलग्न होणे आणि / अथवा सहयोगी होणे, व त्यांच्या सहकार्याने कार्य करणे.
३.११ सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक जीवनात ज्येष्ठ नागरिकांचा संपूर्ण व उत्साहपूर्ण सहभाग असावा यासाठी प्रयत्न करणे.
३.१२ तरुण पिढीच्या मनात सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांप्रती व विशेषतः कुटुंबातील वडिलधाऱ्यांप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे.
३.१३ ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ट गरजांच्या पूर्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सदनिका, वृद्धाश्रम, वृद्धांसाठी घरे, विरंगुळा केन्द्रे, बालसंस्कार केन्द्रे, सामुहिक गृहनिर्माण व वसाहती यांच्या बांधकामाला उत्तेजन व पूर्ण समर्थन देणे.
३.१४ शासकीय यंत्रणांनी प्रायोजित केलेल्या, सामाजिक सुरक्षा व वृद्धांच्या वयोमानानुसार काळजी घेण्याच्या योजनांसाठी निधी योग्य प्रमाणांत उपलब्ध व्हावा याची खात्री करणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक, निवासिय, वैद्यकीय आणि अन्य सुविधांमध्ये वाजवी सवलती प्राप्त व्हाव्या, यासाठी शासनाकडे व त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे.
३.१५ ज्येष्ठ नागरिकांच्या हितसंवर्धनाला आवश्यक, अनुषंगिक व उपयोगी असणारी किंवा, वरील सर्व ध्येये आणि उद्दिष्टे, अथवा त्यांपैकी कोणतेही साध्य करण्यासाठी अन्य सर्व कार्ये करणे.
३.१६ वर लिहिलेली ध्येय व उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी महासंघाच्या (फेस्कॉमच्या) कार्याचे सर्व स्तरांवर, जिथे आवश्यक व संभव असेल तिथे विकेंद्रीकरण करणे.
भाग १ – सर्वसाधारण तरतुदी (अ)
४.१ संस्थेचे नांव ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, महाराष्ट्र’ असे असून यापुढे त्याला फेस्कॉम असे संबोधित केले आहे.
४.२ दर्जा फेस्कॉम ही ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वसाधारण कल्याणासाठी स्थापन झालेली स्वैच्छिक सामाजिक सेवाभावी संस्था असून राजकीय, धार्मिक किंवा सांप्रदायिक पूर्वग्रहापासून अलिप्त आहे.
४.३ कार्यक्षेत्र: फेस्कॉमचे प्रादेशिक कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यभर असेल.
४.४ संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय मंबई येथे राहील आणि प्रशासकीय कार्यालय नियामक मंडळ निर्णय घेईल त्या ठिकाणी असेल. संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय “ज्येष्ठ नागरिक भवन”, जुनी गांवदेवी मंदिरामागे, मु. पो. नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई ४०० ७०६ असे आहे.
४.५ अधिकृत व आर्थिक वर्ष फेस्कॉमचे अधिकृत वर्ष आणि वार्षिक हिशेबाचा कालावधि १ एप्रिल ते नंतरच्या वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत राहील. भारताच्या केंद्र सरकारने यांत बदल केला, तर फेस्कॉमचे हिशेबी व आर्थिक वर्ष आपोआप त्याप्रमाणे बदलेल.
५) व्याख्या : जर या संदर्भात कांही विरुद्ध वा विसंगत नसेल, तर नियम व नियमावलीत अंतर्भूत विविध शब्दांच्या व्याख्या, अर्थ, अर्थबोधन अथवा स्पष्टीकरणे खाली दिल्याप्रमाणे आहेत.
५.१ ज्येष्ठ नागरिक : कोणतीही व्यक्ति जिने वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत, ते सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. फेस्कॉम तसेच फेस्कॉमशी संलग्न संघाचे सभासदत्वाच्या अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला व /वा आधारकार्डाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
५.२ संघ : ज्येष्ठ नागरिक या सर्वसाधारण कल्याणासाठी कार्य करणारी कोणतीही संस्था नियम ६.१ मध्ये विहित सदस्य संख्या असल्यास संघ संबोधिली जाते.
५.३ सर्वसाधारण मंडळ (जनरल बॉडी): ही फेस्कॉमचे सार्वभौम मंडळ आहे, आणि अन्य सर्व कार्यकारी मंडळ व समित्या या मंडळाच्या अधीनस्थ आहेत. महासंघाचे (फेस्कॉमचे) सर्वसाधारण मंडळात सभासद संघाचे प्रतिनिधीं, व अन्य सर्व सभासदांच्या श्रेणीचा समूह ज्यांचे सभासदत्व नियामक मंडळाने त्यांना कळविलेल्या अटींप्रमाणे विधिवत मंजूर केले आहे, यांचा समावेश होतो.
५.४ नियामक मंडळ : हे महासंघाचे (फेस्कॉमचे) कार्यकारी मंडळ आहे आणि यापुढे नियम १३.१ मध्ये विहित निर्वाचित व नियुक्त सभासदांचे बनलेले आहे.
५.५ फेस्कॉम प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या प्रशासकीय, कार्यकारी व संघटनात्मक कामाच्या विकेंद्रीकरणाला सोयीचे व्हावे म्हणून, मुख्यतः क्षेत्राच्या सलगतेच्या आधारावर फेस्कॉमशी संलग्न संघाचे लहान गटांत विभाजन केले आहे, आणि निर्माण झालेला असा प्रत्येक गट ‘फेस्कॉम प्रादेशिक विभाग’ म्हटला जातो.
५.६ प्रादेशिक विभागीय मंडळ : हे फेस्कॉम प्रादेशिक विभागाचे कार्यकारी मंडळ आहे.
५.७ नियम व नियमावली : म्हणजे या घटनेत अंतर्भूत फेस्कॉमचे नियम व नियमावली व कार्य निर्देशिका यांचा समावेश होतो.
५.८ प्रतिनिधी : फेस्कॉमच्या सभासदांनी (नियम ६ खाली उल्लेखित) आवश्यक शिफारस पत्र देऊन नामित केलेली व्यक्ति ही त्या विशिष्ट प्रसंगासाठी विशिष्ट व्यक्तीचा प्रतिनिधी होय.
५.९ मनोहारी मनोयुवा कौन्सिल : फेस्कॉमचे मुखपत्र मनोहारी मनोयुवाचे प्रकाशन करणारे मंडळ आहे.
५.१० पदाधिकारी या संज्ञेत नियामक मंडळ, विभागीय मंडळ व मनोयुवा कौन्सिलसाठीच्या अशा सभासदांचा समावेश आहे. ज्यांचा नियम १३.१, १४.३ अ, व १५.४.१ मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे.
५.११ ग्रामीण क्षेत्र: ज्या गांवी ग्राम पंचायत आहे, ते ग्रामीण क्षेत्र समजले गेले आहे.
संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांची नावे व कार्यकाल
| अध्यक्ष | डॉ. आर एम भट (डोंबिवली) | १९८१-१९८७ |
| सचिव | श्री मराठे, श्री बापट (डोंबिवली) | |
| अध्यक्ष | श्री द रा भिडे (मुंबई) | १९८८-१९८९ |
| सचिव | श्री देशपांडे (डोंबिवली) | |
| अध्यक्ष | प्रा. ज्ञानेश्वर जोशी (जळगांव) | १९९०-१९९१ |
| सचिव | श्री देशपांडे (डोंबिवली) | |
| अध्यक्ष | श्री त्र्यं श्री देशपांडे (डोंबिवली) | १९९२-१९९३ |
| सचिव | श्री वाय बी पाटील (धुळे) | |
| अध्यक्ष | श्री प्रभाकर गोरे (पुणे) | १९९४-१९९५ |
| सचिव | श्री शरद दफ्तरवार (पुणे) | |
| अध्यक्ष | श्री रमणभाई शाह (पुणे) | १९९६-१९९८ |
| सचिव | श्री व ना उन्डे (पुणे) | |
| अध्यक्ष | श्री वाय बी पाटील (धुळे) | १९९८-२००० |
| सचिव | श्री अनंत घोलप (नाशिक) | |
| अध्यक्ष | श्री डॉ. शं पा. किंजवडेकर (नवी मुंबई) | २००१-२००२ |
| सचिव | श्री नाबर (बदलापूर) श्री पेठे (मुंबई) | |
| अध्यक्ष | श्री ए का माजगांवकर (सातारा) | २००३-२००४ |
| सचिव | श्री अनंत घोलप (नाशिक) | |
| अध्यक्ष | श्री म भा कुलकर्णी (मुलुंड) | २००४-२००९ |
| सचिव | श्री मोकाशी (तळेगांव) | |
| सचिव | श्री अनिल कासखेडीकर (मुलुंड) | |
| अध्यक्ष | श्री अनंत घोलप (नाशिक) | २००९-२०१२ |
| सचिव | श्री अनिल कासखेडीकर (मुलुंड) | |
| अध्यक्ष | श्री नि वि कोडोलीकर (पुणे) | २०१२-२०१५ |
| सचिव | श्री माधवराव जोशी (बारामती) | |
| अध्यक्ष | श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी (जळगाव) | २०१५-२०१८ |
| सचिव | श्री अरूण माधव रोडे (पुणे) | |
| अध्यक्ष | श्री अरूण माधव रोडे (पुणे) | २०१८-२०२१ |
| सचिव | श्री अरविंद काशिनाथ कुलकर्णी (कोल्हापूर) | |
| अध्यक्ष | श्री अरूण माधव रोडे (पुणे) | २०२१-२०२४ |
| सचिव | श्री विवेक देशपांडे (डोंबिवली) | |
| अध्यक्ष | श्री अण्णासाहेब शहाजीराव टेकाळे (नवी मुंबई) श्री चंद्रकांत महामुनी (पुणे) | २०२४-२०२७ |
| सचिव |
अध्यक्षीय मनोगत

मा. श्री. अण्णासाहेब टेकाळे
अध्यक्ष
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या म्हणजेच कस्कॉमच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन सर्वप्रथम मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि राज्यातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि
महत्वाचे म्हणजे आरोग्यदायी जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. फेस्कॉमचे हे अधिवेशन लातूरसारख्या महत्त्वाच्या शहरात भी तसा धाराशिव जिल्ह्याचा रहिवासी आहे. पर्वी लातूर हा आमच्याच भरत आहे.
धाराशिव जिल्ह्याचा भाग होता. त्यामुळे लातूर शहराविषयी मला विशेष प्रेम आहे. माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माननीय विलासरावजी देशमुख असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले. कामाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत. पण लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष तसेच माजी गृहमंत्री मी शिवराज पाटील चाकूरकरजी, देशातील नामवंत अशा एम. आय. टी. शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराडजी हेसुद्धा याच लातूरचे. लातूरभूषण व्यक्तिमत्त्वांची यादी करायला बसलो तर खूप ती मोठी बनेल. असे अनेक रथी-महारथी या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले. या ऐतिहासिक तातूर शहरात आपले अधिवेशन भरत आहे याचा खूप आनंद वाटतो. अधिवेशनास जमलेल्या वयाने ज्येष्ठ परंतु मनाने तरुण असलेल्या माझ्या सर्व प्रतिनिधींचे फेस्कॉमचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो.
फेस्कॉम हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचले आहे. पण नुसते नाव पोहोचले म्हणजे संस्था मोठी होत नसते. त्यासाठी कार्यक्षम आणि कर्तव्य कठोर पदाधिकारी हितचिंतकांची संघटनेला नेहमीच गरज असते. आपली ही संस्था स्थापन होऊन ४५ वर्षे झाली. मी गेली १८ वर्षे या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. वेगवेगळी पदे भूषवल्यानंतर आता माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. माझ्या अगोदर मा. डॉ. शं. पा. किंजवडेकर, मा. घोलप साहेब, मा. म. भा. कुलकर्णी, मा. कोडोलीकर, मा. दत्तात्रय चौधरी, मा. अरुण रोडे अशा अनेक मान्यवरांनी हे पद भूषवले आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने ही संस्था वाढवली आणि जोपासली आहे. या लोकांनी प्रचंड काम केले. हेच काम आपल्याला पुढे चालवायचे आहे. अध्यक्षपद ही एक तांत्रिक जबाबदारी आहे. कोणतीही संघटना एकट्या अध्यक्षाच्या बळावर मोठी होत नसते. त्याला हजारो हातांची मदत मिळते तेव्हा संघटना काहीतरी भरीव काम करू शकते. Know More
Our Presence
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)
प्रादेशिक विभाग मुंबई (जिल्हे- नवी मुंबई व इतर उपनगरे )
प्रादेशिक विभाग कोकण (जिल्हे- ठाणे / रत्नागिरी/सिंधुदुर्ग/रायगड/पालघर)
प्रादेशिक विभाग, पुणे (जिल्हे- पूणे / सातारा / सोलापूर)
प्रादेशिक विभाग खानदेश (जिल्हे- जळगांव / धूळे/नंदूरबार)
५. प्रादेशिक विभाग, उत्तर मराठवाडा (जिल्हे- औरंगाबाद / जालना / नांदेड / हिंगोली)
प्रादेशिक विभाग, दक्षिण मराठवाडा (जिल्हे लातूर / उस्मानाबाद / बीड / परभणी)
प्रादेशिक विभाग, पश्चिम विदर्भ जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम
प्रादेशिक विभाग,पूर्व विदर्भ (जिल्हे नागपूर / भंडारा / वर्धा)
प्रादेशिक विभाग, वनवैभव (जिल्हे- चंद्रपूर / गडचिरोली / गोंदिया)
प्रादेशिक विभाग, नाशिक (जिल्हा- नाशिक)
प्रादेशिक विभाग, अहिल्यानगर (जिल्हा- अहिल्यानगर)
प्रादेशिक विभाग, बुलढाणा (जिल्हा- बुलढाणा)
प्रादेशिक विभाग, कोल्हापूर (जिल्हा कोल्हापूर)
प्रादेशिक विभाग, सांगली (जिल्हा सांगली)
