

सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशन ऐरोली या संस्थेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असतात. गुरुवार दिनांक १ मे २५ रोजी या संस्थेचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उच्च विद्या विभूषित, उच्च पदस्थ व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीमुळे व सहभागामुळे हा सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत आण्णासाहेब टेकाळे हे अध्यक्ष म्हणून तर इंद्रावती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे चेअरमन श्रीयुत वसंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री किसनराव पलांडे, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत टी पी आर उन्नी , महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ,मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्रीयुत सुरेश पोटे, तर दैनिक धावते नवनगर चे संपादक श्रीयुत दिपक सोनवणे विशेष अतिथी म्हणून लाभले होते.
संस्थेच्या वतीने दुपारी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच उपस्थितांच्या मनोरंजनासाठी संस्थेचे सभासद श्रीधर झरेकर यांचा सुमधुर हिंदी मराठी गाण्यांचा श्री म्युझिकल ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत करण्यात आले. संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री बबनराव पाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून मागील ५ वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमाच्या कार्य पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिक सभासदांचा व एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सभासदांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या योग शिक्षकांचा ही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री टेकाळे साहेब यांनी जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा बाबत मार्गदर्शन करून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्याची सविस्तर माहिती दिली तर किसनराव पलांडे साहेब यांनी नवीं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ओल्डेज होम बाबत माहिती देताना महापालिकेच्या वतीने विरंगुळा केंद्रासाठी मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वसंतराव चव्हाण यांनी मानवी जीवन हे निसर्गाशी निगडीत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवाने नेहमी प्रयत्नशील असावे असे सुचित केले. तर सुरेश पोटे यांनी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे अधिवेशन नवीं मुंबई मध्ये आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगून संस्थेकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्रीयुत दिपक सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करताना सिनीयर सिटीझन हेल्थ केअर फाउंडेशन ही संस्था ऐरोली मधील एकमेव अशी संस्था आहे जी सर्वंच क्षेत्राशी निगडीत असे विविध उपक्रम राबवित असते असे मत व्यक्त केले.
संस्थेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी ,कार्यकारिणी व सभासदांनी मोलाचं सहकार्य केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्रीयुत खराडे सर यांच्या उत्कृष्ट व दर्जेदार सुत्रसंचलनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
शेवटी संस्थेचे सचिव श्री संजय जाधव यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. नंतर महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



