फेस्कॉम अधिवेशन
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, महाराष्ट्र फेस्कॉमचे एक वैशिष्ट्य असे आहे की, सर्व संघ सभासदांच्या (संलग्र असलेले ज्येष्ठ नागरिक संघांच्या) प्रतिनिधींचे संमेलन दरवर्षी आयोजित केले जात आहे. हे अधिवेशन फेस्कॉमच्या ध्येये व उद्दिष्टचे क्र. ७ आणि नियामक मंडळ अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या क्र. ११.४.२१ च्या अंतर्गत आयोजित केले जातात.
फेस्कॉम अधिवेशन आयोजन करण्यासंबंधी दिशानिर्देश:
१) यजमान संघ / संघांच्या समितीतर्फे करण्याबाबत अर्ज फेस्कॉमचे अध्यक्षांचे नांव में / जून महिन्यात पाठविणे. या अर्जावर संघाच्या अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष त्यांच्या शिफारशींसह फेस्कॉम अध्यक्षांकडे आला पाहिजे. यजमान पदी एकापेक्षा जास्त संघ, सुमारे ५ कमाल, असल्यास त्यांनी अधिवेशन आयोजन समिती करुन या समितीतर्फे वरीलप्रमाणे अर्ज करावा.
२) फेस्कॉमचे सरचिटणीस अशा प्रकारे आलेले अर्ज नियामक मंडळ सभेत विचारार्थ ठेवतील. नियामक मंडळाचा निर्णय अंतिम असेल व त्याचप्रमाणे संबंधित संघाला / अधिवेशन आयोजन समितीला लेखी कळवतील. या पत्राची एक प्रत प्रादेशिक विभागाच्या अध्यक्षाला पाठविली जाईल.
३) यजमान संघ आणि प्रादेशिक विभाग मिळून अधिवेशनाची तारीख व स्थळ ठरवतील. याकामी सरचिटणीस त्यांना मदत करतील. फेस्कॉम अध्यक्षांच्या मंजुरीनंतर अधिवेशनाची तारीख आणि स्थान घोषित केले जाईल. प्रादेशिक विभागाच्या अध्यक्षांनी त्यांच्या विभागातील संघांच्या अध्यक्ष व सचिव यांची सभा बोलावून त्यांना माहिती द्यावी व त्यांचे समर्थन प्राप्त करावे.
४) यजमान पदी असलेला संघ किंवा संघांची समन्वय समिती अधिवेशन सुकाणू समिती स्थापन करतील. या सुकाणू समितीत दहा ते बारा सभासद पुढीलप्रमाणे असतील.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, अधिवेशन कार्यालय प्रमुख, अन्य सदस्य. अध्यक्ष | उपाध्यक्ष समन्वयकाचे कार्य करील व अधिवेशनासाठी स्थापित विविध समिती प्रमुखांशी संपर्क करुन प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतील व सुकाणू समितीच्या सभेत सादर करतील. सचिव किंवा अधिवेशन कार्यालय प्रमुख यांच्या घरी किंवा सोयीच्या ठिकाणी अधिवेशनासंबंधी कागदपत्रे राहतील. या व्यतिरिक्त
सुकाणू समितीत प्रादेशिक विभागीय अध्यक्ष आणि सचिव, फेस्कॉम अध्यक्ष, सरचिटणीस व सहाय्यक सरचिटणीस, पदसिद्ध सदस्य असतील. मागील अधिवेशनाच्या अध्यक्ष/सचिवांचा सल्ला सुकाणू समितीला मिळेल. म्हणून एक दोनदा त्यांनाही आमंत्रित करावे, फेस्कॉमचे अधिवेशन सुकाणू समितीद्वारा फेस्कॉम अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाईल. फेस्कॉमचे अध्यक्ष हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील.
५) अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष पदी परिसरातील एक प्रतिष्ठित, नांवाजलेली आणि ज्येष्ठांविषयी आस्था असलेली व्यक्ति असेल. या व्यक्तिची निवड सुकाणू समितीच्या सभेत सर्वानुमते केली जाईल. या सभेत स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेत एक नवीन बचत खाते उघडण्याचा ठराव मंजूर करावा लागेल. खात्याचे नांवे ‘फेस्कॉम (शहराचे नांव) अधिवेशन (वर्ष)’ असेल व ते खाते कोषाध्यक्ष आणि अध्यक्ष किंवा सरचिटणीस संचालित करतील.
६) अधिवेशन आयोजनासाठी खालील समित्या स्थापन करण्यात येतील.
१) स्वागत समिती.
२) व्यासपीठ व्यवस्था समिती.
३) नोंदणी समिती.
४) अन्नपूर्णा समिती.
५) कार्यक्रम समिती.
६) भांडार समिती.
७) प्रसिद्धी समिती.
८) स्टॉल समिती.
९) सहल व परिवहन व्यवस्था.
१०) स्वयंसेवक समिती.
११) स्मरणिका समिती.
१२) अर्थ समिती.
१३) संरक्षण समिती (पोलीस, ध्वनीक्षेपण, रात्रीचा पहारा इ.)
१४) मंडप, आसन व्यवस्था, ध्वजारोहण व्यवस्था,
१५) आरोग्य समिती.
१६) निवास व्यवस्था समिती.
वरील समिती प्रमुखांची नांवे सुकाणू समिती सभेत मंजूर करण्यात येतील. त्या समितीच्या अन्य सदस्यांची नांवे समिती प्रमुखांच्या सल्ल्याने सुकाणू समिती सभेत निवडली जातील. अर्थ समितीच्या प्रमुखपदी सुकाणू समितीचे कोषाध्यक्ष किंवा सहकोषाध्यक्ष असतील. स्मरणिका समितीचे प्रमुख मुख्यत्वे स्मरणिकेतील जाहिराती गोळा करणे व स्मरणिकेत छापणे आणि जाहिरातीची रक्कम जमा करणे हे करतील. स्मरणिकेचे वाटप देखील हीच समिती करेल. संपादक आणि स्मरणिका मुखपृष्टाचे दोन – तीन नमुने तयार करुन सुकाणू समिती सभेत मुखपृष्ठाची मंजुरी घेतील.
७) सुकाणू समितीच्या सभेत प्रतिनिधी शुल्क ग्रामीण व शहरी / निमशहरी आणि स्वागत शुल्क ठरविता येईल. त्याचप्रमाणे अधिवेशनासाठी प्रत्येक संघाकडून अधिवेशन शुल्क घेण्यात येईल. अधिवेशन शुल्काची
रक्कम देखील सुकाणू समिती ठरवतील. याच सभेत अधिवेशनाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येईल.
८) अधिवेशनाबाबत खालील पत्रके पाठविण्यात येतील.
पत्र क्र.

प्रादेशिक विभागीय अध्यक्षांनी त्यांच्या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांना अधिवेशनात निबंध स्पर्धेत व विविध पुरस्कारांसाठी निर्धारित फॉर्म भरुन पाठविण्यात लिहावे, म्हणजे सहभाग वाढेल.
९) अधिवेशनाबाबत पत्रव्यवहाराकरिता सुकाणू समितीने लेटरहेड छापावे. त्यांत सुकाणू समितीच्या सर्व सदस्य, पदसिद्ध सदस्य यांची नांव असतील. अधिवेशनासाठी स्वतंत्र पावती पुस्तके असावीत. पायती पुस्तकांचा चोख हिशोब ठेवणे आवश्यक आहे. अधिवेशनांत व्याख्याने, निबंध स्पर्धा विजेते, सुकाणू समिती व सदस्य, विधायक मंडळ पदाधिकारी तसेच अन्य मान्यवरांसाठी योग्य व उचित स्मृतिचिन्ह असावे.
१०) अधिवेशनांत दिले जाणारे पुरस्कार :
१) सर्वोत्कृष्ठ ज्येष्ठे नागरिक संघ. राज्यातून एक
२) विशेष उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ (अन्य प्रादेशिक विभागांतून) राज्यातून एक
३) उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक प्रादेशिक विभागांतून प्रत्येकी एक (एकूण विभाग १२)
४) उत्कृष्ट ग्रामिण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यातून एक
५) उत्कृष्ट ग्रामिण ज्येष्ठ नागरिक महिला संघ – राज्यातून एक
६) उत्कृष्ट ज्येष्ठ सेवाभावी पुरुष राज्यातून एक
७) उत्कृष्ट ज्येष्ठ सेवाभावी महिला राज्यातून एक
८) विशेष सदस्य गुणवत्ता पुरस्कार उत्कृष्ट ज्येष्ठ पुरुष कार्यकर्ता राज्यातून एक
९) उत्कृष्ट ज्येष्ठ महिला कार्यकर्ता राज्यातून एक
१०) आदर्श माता – राज्यातून एक
११) आदर्श पिता – राज्यातून एक
१२) उत्कृष्ट प्रादेशिक विभाग – राज्यातून एक
अधिवेशनाचे कार्यक्रम सुकाणू समिती ठरवील. उद्घाटक, प्रमुख पाहुणे व अन्य व्याख्यात्यांना फेस्कॉम अध्यक्षांची मंजुरी आवश्यक आहे.
ह्या पुरस्कारासाठी प्रायोजक घेणे जरुरी आहे. त्यासाठी प्रायोजकत्व निधी रु. १०,०००/-, रु. १५०००, रु. २५००० किंवा अधिक दरवर्षी मिळविण्याचे प्रयत्न करावेत. आलेली रक्कम बँक मुदती ठेवीत गुंतविल्यावर येणाऱ्या व्याजातून पुरस्कार देण्याची व्यवस्था करावी. पुरस्काराचे स्वरुप वेळेनुसार ठरवावे.
११) निबंध स्पर्धा : फक्त फेस्कॉम संलग्न संघांच्या सभासदांकरिता राहील. निबंध पाठविताना निर्धारित प्रपत्र भरुन सोबत ठरविलेले प्रवेश शुल्क पाठविणे आवश्यक आहे.
सर्व निबंध सहाय्यक सरचिटणीसाकडे पाठविले जातात. ते निबंध स्पर्धेसाठी परिक्षक नेमतील. शक्यतो परिक्षकांच्या नोतवाईकांनी निबंध स्पर्धेत भाग घेतलेला नसावा व सामान्यपणे अधिवेशनाच्या एक महिना आधी स्पर्धेच्या विजेत्यांची नांवे घोषित केली जातील व त्यांना, त्यांच्या संघाच्या अध्यक्षांना प्रादेशिक, विभागाच्या अध्यक्षांना लेखी कळविले जाईल. सर्व विजेत्यांनी अधिवेशनात स्वखर्चाने उपस्थित राहून पुरस्कार स्विकारावा ही अपेक्षा आहे. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम दिली जाईल. फेस्कॉमच्या पुरस्कारासाठी सभासदांनी भरलेले फॉर्म्स सहाय्यक सरचिटणीसाकडे पाठविले जातील. त्यांचा वर्गवार मूल्यांकन तक्ता सादर करुन निवड समिती सभेला सादर केले जाईल. या सभेत फेस्कॉम उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहाय्यक सरचिटणीस व कोषाध्यक्ष देखील असतील. सर्वानुमते वर्गवार विजेत्यांची निवड झाल्यावर अध्यक्षांची मंजुरी घेण्यात येईल. सरचिटणीस संबंधित विजेता सभासदांना व त्यांच्या संघांच्या अध्यक्षांना अधिवेशनाच्या एक महिना आधी कळवतील. पुरस्कार विजेत्यांनी स्वखर्चाने अधिवेशनात येऊन पुरस्कार ग्रहण करणे अपेक्षित आहे. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. नियामक मंडळ व प्रादेशिक विभागीय कार्यालय मंडळाचे सदस्य यांनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
१३) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आठ वाजता अधिवेशन स्थळावर फेस्कॉमच्या ध्वजाचे आरोहण अध्यक्षांच्या हस्ते होईल. हा ध्वज अधिवेशनाची सांगता होईपर्यंत फडकत राहिल. याची व्यवस्था मंडप, आसन व्यवस्था समितीचे प्रमुख करतील, ध्वजारोहणानंतर फेस्कॉमबद्दल आस्था व निष्ठा दाखविणारी व अधिवेशन यशस्वी करण्याबाबत खालील सामुहिक शपथ घेण्यात येईल. दुसरे दिवशी संध्याकाळी ध्वजावतरण झाल्यानंतर अधिवेशनाची सांगता होईल.
फेस्कॉमची शपथ :
(स्वतःचे नाव उच्चारावे) सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आणि माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाचा, फेस्कॉमचा सभासद म्हणून ज्येष्ठ नागरिक चळवळीत महासंघाची सर्वमान्य निती नियमांचे पालन करीन. फेस्कॉमची अंगीकृत उद्दीष्टे (मिशन) व दृष्टीपथ (व्हीजन) पूर्ण करण्यास सर्व दृष्टीने प्रयत्न करीन. फेस्कॉमच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य वाढविण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीन.
१४) अधिवेशनाच्या कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार, सुकाणू समितीच्या सल्लायाने अध्यक्षांकडे आहेत.
१५) अधिवेशन झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आंत सरचिटणीस फेस्कॉम यांना प्रमाणित जमा-खर्च सादर करणे आवश्यक आहे. सुकाणू समिती सभेत हिशोब मंजूर झाले पाहिजेत. तसेच सहा महिन्यांत बँकेतील अधिवेशन खाते बंद करावे आणि घटनेतील तरतुदीप्रमाणे शिल्लक रक्कमेचे वाटप करणे (अर्धी रक्कम यजमानांकडे व अर्धी रक्कम फेस्कॉमकडे देणे) आवश्यक आहे. ही जबाबदारी सुकाणू समितीचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांची आहे. फेस्कॉमला मिळालेल्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम संबंधित प्रादेशिक विभागाला देण्यात येईल.
१६) अधिवेशनाच्या आयोजनामुळे फेस्कॉमची प्रतिमा उंचावली पाहिजे आणि ज्येष्ठांसाठी काम करणारी एक प्रमुख समाजसेवा संस्था या रुपाने समाजापुढे आली पाहिजे. नवीन संघ स्थापन करण्याचे व सभासद संख्या वाढविण्याचे हे उत्तम माध्यम आहे.
