यावर्षी पावसाळ्यामध्ये निसर्ग महाराष्ट्रावर जणूं कोपला होता, जल प्रलय होणार असा धुवांधार पाऊस दिवसेंदिवस कोसळतच होता, गावागावात रस्त्यांवर जलप्रपात फुटल्यासारखे पाण्याचे पाटच वाहत होते, शेतीवाडी, गुरेढोरे यांचे अपरंपार नुकसान झाले होते, शेतीची धूप झाली होती, पाण्यात असलेली पिके पूर्णतः सडून गेलेली होती, शेकडो घरांची पडझड झाली होती, सरकार आपल्या परीने प्रयत्न करीतच होते, परंतु “आकाशच फाटले त्याला थिगळ तरी कुठंपर्यंत लावणार” अशी अवस्था झाली होती…*
मराठवाड्याची तर परिस्थिती एकदमच हलाखीची झाली होती, अन्नधान्य घरदार, निवारा सगळच नाहीसं झालं होतं, अशा परिस्थितीत सरकार, सेवाभावी संस्था, आपल्या परीने मदत करण्याचा संपूर्णता प्रयत्न करीतच होते, अंगावरच्या कपड्याशिवाय कांहीच शिल्लक नाही अशी दैना झाली होती, अशा परिस्थितीत कसे जगावे हा प्रश्न पुरग्रस्तांच्या पुढे उभा ठाकला होता, आपल्या कर्तव्य भावनेतून फेस्कॉम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी २८. सप्टेबर रोजी तातडीची ऑनलाईन मीटिंग बोलावली व त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक व प्रादेशिक विभागांना मुख्यमंत्री सहायता निधीला, पूरग्रस्तांकरता मदत करण्याचे आवाहन केले.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांनी प्रादेशिक विभागामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीला भरघोस मदत पाठवली.
पश्चिम विदर्भ प्रादेशिक चार लाख 33 हजार, कोकण विभाग दोन लाख 58 हजार, मुंबई दोन लाख 40 हजार, प्रत्येक प्रादेशिक विभागाने आपापल्या परीने भरघोस मदत दिली, एकूण पंधरा लाख 59 हजार रुपयाचा निधी संकलित झाला होता, त्याचा चेक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, व सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ, यांना मंत्रालयात, फेस्कॉम अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी सुपुर्द केला, सोबत श्री. प्रभाकर गुमास्ते, श्री.सुरेश पोटे, श्री दीपक करकरे, श्री.पामाळे होते.
सामाजिक कर्तव्याची जाणिव ठेवून, ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो, या कर्तव्य भावनेने ज्येष्ठ नागरिकांनी, आपण सरकारकडे नेहमीच काहीतरी मागत असतो, परंतु आपले कर्तव्य पार पाडण्यातही कसूर करीत नाही हे या संकलित निधी मुळे दृष्टोत्पत्तीस आणून दिले.
सुरेश पवार
प्रसिद्धी प्रमुख फेस्कॉम महाराष्ट्र
19/12/2025

